Blogs

2nd-blog.jpg

उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म

अन्न हेच पूर्णब्रह्म मानल्याने अन्नग्रहणाविषयी, अन्न पानात वाढण्याविषयी आयुर्वेदीय ग्रंथात काही नियम दिले आहेत. आजकाल अॅसिडिटी, अल्सर, पोटात वायू धरणे , भूक न लागणे असे प्रकार वाढले आहेत. नियम पाळून जेवण केल्यास असे त्रास टळू शकतात. मुख्य जेवणाची ग्रंथोक्त वेळ सकाळी १० ते १२ असावी. ज्यांना शक्य आहे त्यांनी अवश्य पाळावी. आंघोळ करून जेवायला बसावे. आंघोळ केल्यावर जाठराग्नि प्रदीप्त होतो व भूक वाढते. जेवल्यावर आंघोळ करू नये. स्वच्छ धुतलेले मऊसूत अंगाला फार घट्ट किंवा सैल नाही असे वस्त्र परिधान करून जेवायला बसावे. जेवताना पायात चप्पल असू नये. स्वच्छतेसाठी हा नियम असला तरी शक्यतो टेबलावर बसून जेवताना सुद्धा चप्पल बूट काढावेत. अन्नग्रहण हे यज्ञकर्म आहे असे आपण आपल्या संस्कृतीत मानतो. पूजा किंवा यज्ञ करताना आपण चप्पल-बूट घालत नाही. जेवणापूर्वी 'अन्नपूर्णा स्तोत्र' किंवा 'वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे' हा श्लोक बर्याच ठिकाणी म्हटला जातो. अंजनी गर्भसंभूतं कुमारं ब्रह्मचारिणम्। दुष्टदृष्टिविनाशाय हनुमन्तं स्मराम्यहम् || (क्षेमकुतूहल) हा मंत्र भोजनाच्या आधी म्हणण्यास सांगितला आहे. ह्या मंत्रात हनुमंताचे स्मरण केले आहे. तसेच अन्य एक श्लोक अन्नदोष परिहारासाठी दिला आहे. अन्नं ब्रह्मा रसो विष्णुर्भोक्ता चैव महेश्वर:। ध्यात्वा नारायण देवमन्नदोषैर्न बाध्यते ।। या दृष्टिः सर्वलोकेषु दृष्टिर्या च स्वभावत: । आत्मदृग्दोषनाशाय संस्मरेन्नारदं मुनिम्|| (क्षेमकुतूहल) ह्या श्लोकाचा अर्थ असा आहे कि अन्न म्हणजे ब्रह्मा, रस हा विष्णु व शंकर भोक्ता आहे. अश्या प्रकारे त्रिदेवांचे स्मरण केल्याने अन्नाला दृष्टीदोष लागत नाही. नारदमुनींचे स्मरण केल्याने देखील दृष्टीदोषाचा नाश होतो. घराबाहेर, हॉटेलमध्ये जेवताना किंवा मिठाई, स्ट्रीटफूड खाताना हा श्लोक अवश्य म्हणावा. ह्या अन्नावरून अनेक लोकांची दृष्टी गेलेली असते. जेवणापूर्वी आल्याचा तुकडा व सैंधव मीठ खावे. त्याने जीभ साफ होते, भूक वाढते, रूच वाढते. जेवायला बसताना पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसावे. जेवायला मांडी घालून जमिनीवर बसायची पद्धत होती. खाली बसल्यावर जेवणाऱ्याच्या समोर त्याच्या बेंबीपर्यंत येईल असे उंच पीठक (टेबल) ठेवावे. त्यावर स्वच्छ ताट किंवा पत्रावळ, केळीचे पान ठेवून त्यावर जेवण वाढावे. क्षेमकुतूहल ह्या आयुर्वेदीय पाकशास्त्र ग्रंथात जेवणाचे पान कसे वाढावे या संदर्भात सूचना आहेत. तत्र भक्त परिन्यस्तं मध्यभागे सुसंयतम्। केळीच्या पानावर किंवा स्वच्छ ताटात मधोमध भात वाढावा. भात अग्निवर्धक, पथ्यकर, तृप्त करणारा, पचायला हलका असतो. भारतीय जेवणात भात हे मुख्य अन्न आहे. म्हणूनच कदाचित ते मधोमध वाढले जाते. मसालेभात, दहिभातासारखे प्रकार सुद्धा मधोमध वाढावेत. सूपः सर्पिः पलं शाकं पिष्टमन्नं तु मत्स्यकम् ॥. स्थापयेद् दक्षिणे पार्श्वे भुञ्जानस्य यथाक्रमम् । डाळ, तूप, मांस, भाजी व मासे अनुक्रमे ताटाच्या उजव्या बाजूला वाढावेत. भात, डाळ, मांस, भाजी, मासे हे सर्व भक्त या भोजन प्रकारात येतात. भक्त म्हणजे चावून खाण्यायोग्य पदार्थ. सूप म्हणजे डाळीची आमटी. मुगाची डाळ मीठ व सुगंधीत मसाल्यांबरोबर बरोबर व्यवस्थित शिजवून दहि बरोबर खावी. मूगाची डाळ पचायला हलकी असते, कफ-पित्त दूर करते व थंड असते. मूगाप्रमाणेच उडीदाची सुद्धा आमटी बनविली जाते. तिचे गुण सांगितले ग्रंथात दिले आहेत. उडीद स्निग्ध, वीर्य वाढाविणारे, वातदोष कमी करणारे, थोडेसे उष्ण, बल वाढविणारे, स्वादिष्ट व रुचिकारक असते. तूप पचनशक्ती वाढविणारे, पित्त व वाताचे संतुलन ठेवणारे, डोळ्यांसाठी हितकर, बलवर्धक, थंड आहे. मांसाचे तलित, भ्रष्ट, स्विन्न, तान्दूर असे विविध प्रकार आहेत. मांस बलदायक आहे. प्रलेहाद्या द्रवाः सर्वे पानीयं पानकं पय:। डाव्या बाजूला प्रलेह म्हणजे चाटून खाण्याचे पदार्थ जसे चटणी, द्रवपदार्थ जसे पाणी, दूध व सरबत ठेवावेत. चोष्यं सन्धानकं लेह्यं सव्ये पार्श्वे प्रदापयेत् । चोष्य म्हणून चोखून खाण्याचे पदार्थ, चाटून खायचे लेहपदार्थ, लोणचे डाव्या बाजूला वाढावे. सर्व इक्षुविकाराश्च पक्वान्नं पायसं दधि। पुरत: स्यापयेद् भोक्तुर्द्वयो: पङ्क्तयोश्च मध्यतः। गूळापासून बनविलेले सर्व गोड पदार्थ, पक्वान्ने पायस, दहि हे सर्व मधोमध वरच्या बाजूला वाढावे. पूर्वी स्वास्थरक्षणाच्या हेतूने अश्या प्रकारे नियम पाळून राजाला भोजन वाढले जाई. जे पदार्थ कमी प्रमाणात खाल्ले गेले पाहिजेत जसे कि चटणी, कोशिंबीर, लोणचे, पापड डाव्या बाजूला वाढतात. भात, डाळ, मांस, मासे , भाजी असे शरीराला बल देणारे, जास्त प्रमाणात खाल्ले जाणारे पदार्थ उजव्या वाढले जातात.गोड व तूपकट पदार्थ पचायला जड असतात. ते जेवणाच्या सुरवातीला खावेत. आंबट, खारट, तिखट, कडू अश्या चवीचे पदार्थ जेवणाच्या शेवटी खावेत. जेवताना मध्ये मध्ये पाणी प्यावे. शक्य असल्यास सुवर्णसिध्द्धजल प्यावे. जेवण झाल्यावर किंवा जेवणापूर्वी खूप पाणी पिऊ नये. जेवल्यानंतर वाटीभर ताक प्यावे. मुखशुद्धीसाठी तांबूल (विडयाचे पान) खावे. एक एव न भुञ्जीत यदीच्छेत्सिद्धिमात्मनः ॥ द्वित्रिभिर्बहुभिः सार्धं भोजनं तु दिवानिशम् । ततश्चाभीष्टसिद्धिः स्याद्दिष्टकामं तु संपदः ॥ एकटे बसून जेवू नये. दोन, तीन किंवा जास्त लोकांनी एकत्र बसून भोजन करावे. असे केल्याने अभीष्टसिद्धी होते व इच्छेप्रमाणे धन प्राप्त होते असे म्हटले आहे. एकत्र भोजन केल्याने परस्पर स्नेहसंबंध वाढतात. जेवण वाढणार्यास परिवेषक म्हणतात. परिवेषक हा स्वच्छ वस्त्र धारण करणारा, प्रसन्नमुख, आग्रह करून प्रेमाने भोजन वाढणारा असावा. परिवेषक विष्णुपूजा करणारा असावा असे मत क्षेमशर्माने क्षेमकुतूहल ग्रंथात दिले आहे. चरकसंहिता, काश्यपसंहिता, सुश्रुतसंहिता, क्षेमकुतूहल, भोजनकुतूहल अश्या अनेक ग्रंथांमध्ये भोजनविषयक नियम आहेत. जिज्ञासूनी अवश्य वाचावेत, वैद्यांकडून माहित करून घ्यावेत व आचरावेत.